Total Pageviews

Friday, November 6, 2020

स्वरानंदचा सुवर्णमहोत्सव

 

 

नोव्हेंबर  ७ ला "स्वरानंद "संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता होत आहे..

त्या निमित्ताने या संस्थे विषयीची कृतज्ञता...

 आपल्या रंगमंचीय कार्यक्रमाची सुरवात एखाद्या नावाजलेल्या संस्थेमधून होणं ही गोष्ट कोणत्याही


कलाकाराला आनंद देणारीच असते. माझे वडील श्री. भालचंद्र देव हे स्वरानंद संस्थेमध्ये अनेक वर्षे व्हायोलिन वादक म्हणून त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होते. 'मंतरलेल्या चैत्रबनात', या कार्यक्रमातही  वडील व्हायोलिनची साथ करीत.  संस्थेत संगीताची बाजू सांभाळणारे प्रा. हरिष देसाई आणि व्यवस्थापनाची बाजू सांभाळणारे प्रा. प्रकाश भोंडे हे होते. 


या कार्यक्रमाची तालीम देसाई सरांच्या घरी होत असे. कधी कधी मी ही तालीम बघण्यासाठी वडीलांबरोबर जात असे.  अत्यंत शिस्तीत आणि वेळवर सुरू होणा-या तालमीला सर्वजण वेळवर हजर असत. मलाही त्या गाण्यांची गोडी वाटू लागली.  व्हायोलिनसाठी आठ कलाकार होते. मलाही कार्यक्रमात वाजवावे असे वाटले.  मग मी त्या सर्व गाण्यांचे म्यूझिक पिसेस घरी तालीम करून बसविले आणि एक दिवशी देसाई सरांना वाजवून दाखविले... आणि माझा 'स्वरानंद' या एका नावाजलेल्या  संस्थेमध्ये  प्रवेश झाला. खूप आनंद झाला.


संस्थेच्या १९८३ ते १९९८ अशी जवळजवळ १५ वर्षे  मी 'स्वरानंद ', संस्थेच्या अनेकविध कार्यक्रमांना व्हायोलिनची साथ केली.  त्यात सावरकरांवरील गीतांचा - 'नमन मृत्यूंजयवीरा'.  सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यांचा -'रिमझिम स्वरांची'.  पु .लं च्या गाण्यांचा -'पुलकित गीते'.  शांताराम आठवलेंच्या गीतांचा  -'आधी बीज एकले'.  आणि बाबुजींच्या गाण्याचा  -'तुझे गीत गाण्यासाठी..'असे काही निवडक कार्यक्रम.


गदिमांच्या 'मंतरलेल्या चैत्रबनात ..' या कार्यक्रमाचे तर जवळपास १४२ कार्यक्रम मी वाजविले. 'मंतरलेल्या चैत्रबनात'..चे  पुण्यात आणि बाहेरगावी असे सतत कार्यक्रम सुरु होते. 'स्वरानंद'च्या प्रत्येक कार्यक्रमाला तुडूंब भरलेले सभागृह कार्यक्रमाचा दर्जा दाखवून देत होते. 'प्रभात समयो पातला.. या गाण्यापासून सुरु झालेल्या कार्यक्रमाची 'वेद मंत्राहून आम्हा, वंद्य वंदेमातरम'.. या गीताने सांगता होत असे.. आणि प्रेक्षक पुढच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पहात असत.


श्री. रमाकांत परांजपे, गिरीश जोशी, अनुराधा मराठे, प्रा. अरूण नूलकर, प्रमोद रानडे, श्रीपाद उंब्रेकर, दरेकर, वीणा जोगळेकर, मीनल रत्नपारखी, प्रतिभा इनामदार, सुनिती  केळकर,संजय पंडित,लीलाताई कानडे,शैला मुकुंद, सुधीर गाडगीळ, रंजना पेठे..किती नावे घेऊ..  असे सर्व कलाकार या कार्य़क्रमात असत. अत्यंत दर्जेदार अशा या कार्यक्रमांमधून साथ करण्याची संधी मिळाली हे खरोखरच मी माझे भाग्य समजते.


अशा या 'स्वरानंद' संस्थेच्या सुवर्णमहात्सवी वर्षाची सांगता येत्या ७ नोव्हेंबर रोजी होत आहे.  वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या संस्थेमार्फत होत असतात. दरवर्षी गुणी कलाकार निवडून त्यांना ' स्वरानंद' पुरस्कारही दिले जातात. श्री. प्रकाश भोंडे हे गेली ४८ वर्षे संस्थेचे काम पहात आहेत.  कोणतीही संस्था वर्षानुवर्ष चालविणे हे खरोखरच अवघड काम आहे.  संस्थेच्या कार्यकारीणावर अजून बरेच मान्यवर लोक काम करतात. त्यांनाही अनेक शुभेच्छा. संस्थेचे कार्यक्रम, उपक्रम असेच सुरु रहावेत आणि रसिकांना आनंद मिळत राहो, हिच प्रार्थना.


माझ्या रंगमंचीय कार्यक्रमाची सुरवात करणा-या या 'स्वरानंद', या संस्थेविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते आणि सुरांचा आनंद देणा-या या 'स्वरानंद'ला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते. 




- सौ. चारूशीला गोसावी, पुणे

 ( व्हायोलीन कलाकार)

No comments:

Post a Comment