Total Pageviews

Sunday, December 25, 2011

`आवर्तन`ने दिली तबला वादनाची सुंदर मैफल






















तबला वादनाचे अनेक कार्यक्रम व्हावेत आणि त्यातून उदयोन्मुख तबलावादकांना स्वतःचे स्वतंत्र व्यासपीठ मिळावे यासाठी पुण्याच्या विजय दास्ताने, हेमकांत नावडीकर, मोहन पारसनीस, संजय करंदीकर आणि अभिजित जायदे या तबला वादकांनी एकत्र येऊन `आवर्तन` या कार्यक्रमाची कल्पना मांडली आणि प्रत्यक्षात आणली. दर महिन्याच्या तिस-या रविवारी तबला वादनाचे खास आयोजन ही वादक कलावंत मंडळी करत असतात.

रविवार,१८ डिसेंबर २०११ला अशीच एक तबला वादनाची मैफल खास आयोजित केली होती. यात संजय करंदीकर यांचे स्वतंत्र तबला वादन आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या वादनाची मैफल सादर झाली. भरत नाट्य मंदिरात झालेल्या या कार्यक्रमासाठी अनेक तबला वादक तर आले होतेच पण संगीत क्षेत्रातले चाहतेही या बादनाच्या ओढीने एकत्रितपणे आनंद घेण्यासाठी हजर होते.

संजय करंदीकर यांनी तबला वादनाचे धडे आपल्या वडिलांकडून आणि सध्या ते पं. सुरेश तळवलकर यांचे मार्गदर्शन घेत आहेत. आपल्या वादनात पेशकार, कायदा, चक्रधर असे अनेक प्रकार पेश करून संजय करंदीकर यांनी रसिकांची दादही मिळविली.

उत्तरार्धात तालयोगी पं, सुरेश तळवलकर यांचे तबला वादन रंगले. सुरवातीला त्यांनी रूपक तालाने वादनाचा आरंभ केला. त्यांच्याबरोबर पखावाजाची साथ ओंकार दळवी, काहोल या वाद्याची साथ मयंक बेडेकर, तसेच तळवलकरांची कन्या सावनी तळवलकर यांनी केली. त्यांना गायनाचा लेहरा ह्षीकेश बडवे यांनी तर हार्मोनियमवर लेह-याची साथ मिलिंद कुलकर्णी यांनी केली.पं. तळवलकर यांनी आपल्या स्वतःची तबलावादनाची वेगळीच शैली दाखवित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

पाव मात्रा, अर्धी मात्रा, पावणेतीन मात्रा अशा अत्यंत अवघड अशा गणिती तबलावादनाने श्रोते अक्षरशः अवाक् झाले. त्यांची पढंत सूध्दा इतकी सुंदर होती की त्यालाही रसिकांची मनमुराद दाद मिळाली. आघात, अनाहत, आमत हे सर्व तबलावादनातले प्रकार त्यांनी अगदी सहज सुंदरपणे सादर केले. डोक्यात चाललेला तालांचा हिशेब जसाच्या तसा हातातून तितक्याच वेगाने वाद्यातून उमटत होता.

एखाद्या वाद्यावर प्रभुत्व मिळविणे म्हणजे काय याची अनुभूती पंडीतजींच्या तबला वादनातून रसिकांना अनुभवायला मिळाली. उपस्थितांनी अखेरीस त्यांना उभे राहून टाळ्यांनी त्याच्या कलेला दाद दिली, ते दृष्यही विलक्षण होते. वादनाला मिळालेली काहोल आणि पखवाजीची साथही तेवढीच तयारीची होती. सावनी तळवलकर यांनीही वडिलांच्या बरोबरीने तबलावादन करुन रसिकांची वाहवा मिळविली. ह्षीकेश बडवे यांनी गायनाच्या लेह-याची समर्पक साथ केली. मिलिंद कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या रागातील लेहरा वाजवून कार्यक्रमाची रंगत अधिकच खुलविली.

असा सुंदर कार्यक्रम सादर केल्याबद्दल रसिकवर्ग या कार्यक्रमाच्या आठवणी घेऊन तृप्त मनाने घरी परतला.
`आवर्तन` संस्थेकडून अधिकाधिक अशाच दर्जेदार कार्यक्रमाची अपेक्षा निर्माण झाली आहे.
त्यांना यापुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.



-सौ. चारुशीला गोसावी, पुणे
charusheelagosavi@gmail.com
9421019499

Wednesday, November 30, 2011

व्हायोलिन वादनात तरबेज- चारूशिला गोसावी






कार्तिकी एकादशीच्या दिवशीचा प्रसंग. श्रीराम साठेंच्या संतदर्शनच्या वतीने सादर झालेल्या नामाचा गजर कार्यक्रमानंतर व्हायोलिनची साथ करणाऱ्या चारुशीला गोसावी यांच्या कडे तुमच्याकडून एक अभंग व्हायोलिनवर ऐकायचा होता. किती सुरेल साथ करता हो तुम्ही.वयोवृद्ध गृहस्थ प्रेमाची इच्छा व्यक्‍त करताना तेवढ्याच प्रामाणिकपणे बोलत होते. साथीदाराला असे काही ऐकले की मूठभर मास चढते. का चढू नये? गेली तीस वर्षे त्या एकनिष्ठेने व्हायोलिन वादनाची साधना करीत आहेत. गाण्यातला असा एकही प्रकार नाही की ज्याली त्यांनी साथ केली नाही.

पुण्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या चाहत्यांचे जाळ ेनिर्माण झाले आहे ते त्यांच्या वादनातील कौशल्याने.वयाच्या नवव्या वर्षी वडिलांकडून वारसा घेऊन व्हायोलिन वादनातले धडे घ्यायला सुरवात केली.वयाच्या सोळव्यावर्षी व्हायोलिन वादनातील संगीत विशारद पदवी मिळविली. या वादनातले त्यांचे गुरू म्हणजे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. गजाननराव जोशी यांचे शिष्य भालचंद्र देव.

घरी वडील्यांच्या संगतीत या कठीण वाद्याची गोडी लागली . नकळत बो हातात घेतला गेला आणि वाद्यावर बोटे फिरून स्वर आकाराला आले. त्याच स्वरांनी घर भारले गेले आनंद निर्माण होतोय ही जाणीव झाली आणि वडलांनी कन्येला वादनाचे धडे द्यायला सुरवात केली. आजही ती त्यांच्या सोबत व्हायोलिन वादनाची जुगलबंदी रंगवताना "बापसे बेटी बेहतर" आहे अशी जाणीव रसिकांना करून देते.

गुरूपौर्णिेमेच्या एका संध्याकाळी भारत गायन समाजच चारुशीला देव यांनी एकटीने स्वतंत वादन केले. तेव्हाच त्यांच्यातल्या वादन कौशल्याची तयारी दिसली. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सुगम संगीतापासून स्वतंत्र शास्त्रीय वादनापर्यंतचे सारे टप्पे पार करीत. स्वतंत्र शैलीदार व्हायोलिन वादक म्हणून चारुशीला गोसावी आज उणी पुरी तीस वर्षे महाराष्टाला परिचित झाल्या आहेत.

स्वरानंदच्या आपली आवडमधून गाण्यांच्या कार्यक्रमाला त्यांचे साथीदार म्हणून जोडले गेले. पु.लं कडून कौतुक झाले.वाजवताना स्वतःला सुगमसंगीत गाता आले पाहिजे असा अट्टाहास मनी घेऊन मंदाकिनी चाफळकर आणि गजाननराव वाटवे यांचेकडे रीतसर शिक्षण घेतले. त्यांनी मनावर घेतले तर त्याही उत्तम गाणे म्हणू शकतात .स्वरानंद, झलक, त्रिमूर्ती (महिला ग्रुप),संतदर्शन अशा संस्थांतून व्हायोलिनची साथ केलेल्या चारुशीला देव यांना लग्नानंतरही ही कला जोपासता नव्हे वाढविता आली . याचा अधिक आनंद आहे.

पती राजय गोसावी निवेदक तर मुलगा रविराज तबला साथ अशी संगत जमली. स्वरबहार तर्फे पहिला गाणारे व्हायोलिनची तयारी केली. आजही त्यांचे वादन ऐकण्यासाठी गावोगावची विचारणा होत आहे.कुंदगोळच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासकट अनेक ठिकाणी त्याच्या स्वतंत्र वादनाने रसिक तृप्त झाले आहेत.

आकाशवाणीच्या बी हाय दर्जाच्या त्या कलावंत आहेत. मुंबई दूरदर्शनच्या युवदर्शन मधूनही त्या झळकल्या आहेत. शास्त्रीय संगीताच्या दोन सीडीही प्रकाशित झाल्या आहेत.पुण्यात बीएसएनएलमध्ये नोकरी करून त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत २१ वेळा व्हायोलिन वादनात सुवर्णपदक मिळविण्याची किमया केलेल्या या कलावंताचे वादन ऐकण्याचा योग अनेकांना आला आहे.

आपल्याला कुणासारखे तरी व्हायचे आहे यापेक्षा नावाजलेल्या व्हायोलिन वादनात स्वतःला दर्जा मिळावा अशी त्यांची साधना आजही सुरू आहे.घर, नोकरी सांभाळून वादनातले बारकावे त्या आजही शिकताहेत. विद्यार्थी दशा असली तर चांगले ते सारे टिपून आपल्या वादनात ते कसे आणता येईल याचा अट्टाहास सतत सुरू असतो.

सुभाष इनामदार,पुणे

त्यांच्याच काही गाण्यांची ही लिंकhttp://www.youtube.com/results?search=Search&resnum=0&oi=spell&search_query=charusheela+gosavi&spell=1&sa=X

Sunday, November 27, 2011

पिता म्हणजे पडद्यामागचा कलाकार












फादर्स डे निमित्ताने मी लिहलेला लेख तुमच्यापर्यंत पोहोचवावा असे वाटले...




'फादर्स डे' असं म्हटल्यावर किती छान वाटतं नाही? कारण प्रत्येकाच्या तोंडी सतत फक्त आईची महती, आईशी असणारं नातं, याचंच वर्णन ऐकायला मिळतं. पण पिता म्हणजे पडद्यामागच्या कलाकाराचं महत्त्वपूर्ण काम करणारं एक व्यक्तिमत्त्व.

घरातल्या सर्वांचा एक भक्कम आधारस्तंभ, मनातलं दु:ख आतल्या आत गिळून सर्वार्थानं मुलांशी व बायकोशी भावनिक नातं जपणारा. पण तरीही मुलांच्या मनात मात्र 'बाप' रे अशीच भीती असते.आजची पिढी मात्र थोडी भीतीच्या पलीकडे जाऊन मित्रत्त्वाची नाती जपणारी वाटते. पण त्याबरोबरच आदराचीही भावना असायला हवी. प्रेमाच्या नात्याप्रमाणंच वेळप्रसंगी दटावणारा सूरही वडिलांचा असलाच पाहिजे.

लग्नाला पंचवीस वर्षं झाली तरी आम्हाला अजूनही वडिलांची (पं.भालचंद्र देव)आदरयुक्त भीती वाटते. घराचा एक भक्कम कणा, वरून फणस पण आतून मृदू. बायकोचे हट्ट पुरविणारा, मुलांचे लाड करणारा, घर नावाच्या विद्यापीठाचा एक जणू कुलगुरूच अशी कितीतरी रूपं असणारं एक वेगळं व्यक्तिमत्त्व.



अशा या व्यक्तिमत्त्वाचं स्थान हे आई इतकेच महत्त्वाचे असते. ते कधी दुय्यम नसते. माझे नाते तर वडील आणि गुरू असं दोन्ही बाजूंनी बांधलेलं. व्हायोलिन वाजवताना मी त्यांच्यासमोर फक्त त्यांची शिष्याच. चुकल्याक्षणी पायावर गजाचे (व्हायोलिनचा बो) फटके मारणारे; पण नंतर स्वत:च हळवे होणारे. मी सासरी निघताना पाठमोरे होऊन डोळे पुसणारे, संगीतातील एम. ए. पदवी मिळाल्यानंतर तो आनंद फक्त डोळ्यांतून व्यक्त करणारे, माझा रंगलेला कार्यक्रम पाहून समाधानाने पाठीवर थाप मारणारे आमचे नाना बघितले की, वाटतं खरंच पित्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे.



- चारुशीला गोसावी

Friday, November 25, 2011

निगर्वी संगीतकार हरपला



` संगीतकार विलास आडकर यांचे निधन ` अशी बातमी वर्तमानपत्रात वाचली खरी....पण त्यानंतर कितीतरी वेळ यावर विश्वासच बसेना. काही दिवसांपूर्वाच आम्हा उभयतांना ते रस्त्यात भेटले आणि आमच्या सर्व घरच्या लोकांची आपुलकीने चौकशी केली. ब-याच मनमोकळ्या गप्पाही मारल्या.

अनेक वर्षीपासून आमची ओळख असल्यामुळे माझे आई-वडिल, सासू-सासरे यांनाही ते खूप मानत असत. त्यामुळेच तर त्यांच्या निधनाची बातमी वाचून वाईट तर वाटलेच....पण दिवसभर खूप बेचैन वाटत होते.

आडकरांचे रेडिओवरचे स्वरचित्र असो.. कोणतीही जिंगल करायची असो... किंवा एखाद्या कार्यक्रमाची तालीम करायची असो... आणि प्रत्यक्ष कार्यक्रम असो...हसत-खेळत वातावरणात ते सारे पाड पाडत...कुठेही `स्व`ची बाधी नाही किंवा अहंपणाचा दर्प नाही. सगळ्याच कलाकारांशी मिळून-मिसळून वागणा-या आडकरांनी कधीही मी फार मोठा संगीतकार आहे.... य़ाची कधीही जाणिव होऊ दिली नाही.

हार्मोनियम, सिंथेसायझर, ऐकॉर्डियन अशा सर्वच वाद्यांवर त्यांची हुकुमत होती.



`जाने कहॉं गये वो दिन` ह्या कार्यक्रमासाठी तर त्यांनी आणि अनिल गोडे यांनी अपार मोहनत घेतली होती. त्यांच्या या कार्यक्रमात आम्ही आठ व्हायोलिनिस्ट काम करत होतो. तोही अनुभव अतिशय चांगला होता.

महान संगीतकार राम कदम यांच्याकडेही त्यांनी काम केले होते. अनेक चित्रपटांनाही त्यानी उतम संगीत दिले होते.
कार्यक्रमात जास्तीच जास्त कलाकारांना सहभागी करुन सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा आग्रही तेवढाच निगर्वी असे त्यांचे व्यक्तिमत्च होते. कोणाला कधीही न दुखावता आपलेपणाने सर्वांशी त्यांचे मित्रत्वाचे नाते होते... असा माणसे व कलावंत जोडणा-या एका संगीतकाराचे अकाली निधन झाले....

त्यांच्या जाण्याने संगीताबाबत काळाप्रमाणे बदलताना परंपराही जपणारा एक संगीत अभ्यासक हरपला....वेगवेगळ्या प्रयोगातून स्वतःचे वेगळेपण जपत कायमच ते पडद्यामागे राहिले. फार पुढे आले नाहीत. मेलडी मेकर्स, चंद्रर्शखर गाडगीळ आणि जोस्ना गणपुले यांच्या कार्यक्रमातून रंगमंचावर दिसणारा हा कलावंत स्वतःचे अस्तित्व मागे सोडून गेला...अम्हा सर्व कलावंतांच्या वतीने या संगीतकार कलावंताला आदरांजली...



सौ. चारुशीला गोसावी, पुणे
charusheelagosavi@gmail.com
9421019499

Friday, November 11, 2011

खणखणीत गाणारा गायक- श्रीपाद भावे


` अनंतरंग आर्ट फौंडेशन `चा पुरस्कार गायक श्री. श्रीपाद भावे यांना जाहिर झाल्याची बातमी वाचली आणि खूप आनंद झाला. या संस्थेच्यावतीने दरवर्षी संगीत क्षेत्रातील कलाकारांना पुरस्कार दिला जातो, ही खूप कौतुकाची बाबा आहे..त्याबद्दल श्री. अनंत भिडे यांना मनापासून धन्यवाद!

श्री. श्रीपाद भावे आणि माझी जवळजवळ वीस वर्षापासूनची संगीत मैत्री. कार्यक्रमातूनच आमचा परिचय झाला आणि ही मैत्री अधिकाधिक दृढ झाली.

आवाजाचा जोरकसपणा आणि सुरेलपणा ही त्यांच्या आवाजाची वैशिष्ठ्ये. एखाद्या कार्यक्रमात काही तांत्रिक बिघाडामुळे ध्वनीक्षेपक बंद झाला तर तिथे फक्त श्रीपाद भावेंचाच आवाज ऐकू जाईल इतके त्यांचे गाणे खणखणणीत असते.
अतिशय मनमिळावू, कलेशी प्रामाणिक, कोणत्याही कार्यक्रमात अतिशय तन्मयतेने गाणारे श्रीपाद भावेंसारख्या योग्य गायक कलाकालारा हा पुरस्कार मिळाला असे म्हटले तर वावगे होणार नाही.

नोकरी करुन संगीत कलेची सेवा करीत असलेले भावे गेली अनेक वर्षं विविध पठडीतले गाणे जपताहेत. भजन, लावणी, सुगम आणि शास्त्रीय संगीताचा ठेवा त्यांच्याकडे आहे.

अनेक कार्यक्रमातून आम्ही एकत्र असतो पण कधीही आपल्याला बिदागी किती मिळणार याचा विचारही त्यांच्या मनात नसतो. संतदर्शन मंडळाचे ते प्रमुख गायक आहेत. नुकताच चेन्नईजवळ `आडियार` येथे भजनरंग कार्यक्रमात त्यांना `भजन भूषण` हा हा पुरस्कार दिला गेला होता.

अतिशय साधा आणि निगर्वी सच्चा कलावंत म्हणून
त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला याचा सर्वच संगीत क्षेत्रातल्या कलावंतांना आनंद होईल.



-चारुशीला गोसावी, पुणे
9421019499
charusheelsgosavi@gmail.com

Thursday, November 3, 2011

व्हायेलिनलाही बोलते केलेस


माझ्याबद्दल पुण्याचे माझे मित्र सुभाष इनामदार यांनी लिहले आहे...मला ते भावले.ते तुमच्यापर्यंत पोचवावेसे वाटले...म्हणून...
यातला गर्वाचा कांही भाग सोडून द्यायचा...माझे घडणे त्यांनीही पाहिले आहे त्यातून त्यांना जे वाटले ते त्यांच्याच शब्दात आपण वाचा..
आणि प्रतिक्रिया कळवा..


सौ. चारूशिला गोसावी,
व्हायोलिनवादक, पुणे
मोबा..९४२१०१९२९९
ई.मेल-chrusheelagosavi@gmail.com


स्वतःवर आणि स्वतःच्या कलेवर मनापासून प्रेम करणारी तू
आत्मविश्वास आणि करुन दाखविण्याची जिद्द
तारांच्या कंपनातून स्वर निर्माण करण्याचं सामर्थ्य़
कलेत रमणारं तुझं मन
वडिलांची कडक शिस्त
करारी स्वभाव
यातूनच तुझ्यात करुन दाखविण्याची हिंमत आली
पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्यामुळे व्हायोलिनवर पूर्ण लक्ष केंद्रित केलेस
स्वर शोधण्यासाठी अपार मेहनत घतलीस
अनेक कलावंतांना साथ करताना बिदागीचा विचार केला नाहीस
सतत या ना त्या कार्यक्रमात रसिकांसमोर दिसत राहिलीस
आधी आई-वडीलांच्या घरी, अभ्यासात नंबर कमावून वाद्याची साधना एकाग्रतेने केलीस
स्वतःला झोकून दिलेस
संगीत ऐकलेस
मनन केलेस
स्वतःची छाप वाद्यावर पाडलीस
वाद्यावर हुकमत गाजविलीस
स्वतःचे कलावंत म्हणून स्थान मिळविलेस
साथ करताना मनातून स्वरात
आपल्याच नादात
तन्मयतेने कुशलता मिळविलीस
आकाशवाणी, दूरदर्शनवर स्वतःला सिध्द केलेस
टेलिफोन खात्यात सेवा करतानाही कलेला प्राधान्य देताना संबंध जपलेस
खात्याअंतर्गत स्पर्धेत स्वतःच्या कलेला आणि व्हायेलिनलाही बोलते केलेस
कलावंताची स्वतंत्र ओळख न करुन देता
माणूसकीचे धागे निर्माण केलेस
संबंध दृढ केले, राखले, वाढविले, घडविलेस
सासरी संसारात स्वराला आणि घरातल्या कामांना अग्रक्रम दिलास
नात्यात चांगूलपणा जपलास
सासू-सास-यांवर आनंदाचा वर्षाव केलास
पतीच्या सुखात सुख
दुःखात, कष्टात बरोबरीच्या नात्याने उभी राहिलीस
प्रसंगी त्याच्याही गुणांना वाव दिलास
मुलांना वाढविताना
संस्काराबरोबरच सूरांचे लोण पसरविलेस
घर स्वरसंसारिक केलेस
तपाला फळ येईतो साधनेत रमलीस
कुणाचा दुस्वास केला नाहीस
कुणाला अति महत्व दिले नाहीस
नाती, मग ती संसारातली किंवा सूरांच्या साधकांची असो, कायम राखलीस
रसिकांतही केवळ साथीदार म्हणून लोकप्रियता न मिळविता
स्वतःच्या वाद्याने, क्वचित प्रसंगी आपल्या सूरांनी आपलेसे केलेस
गाणी गुणगुणत राहताना गाण्यांनाही आळविलेस
सुगम संगीताची तालिम मिळविलीस
साधकाची इतिपूर्ती न मानता आजही प्रामाणिकपणे तालीम करत राहिलीस
स्वतंत्र वादन व्हावे अशी रसिकता मिळविलीस
प्रसन्न चेहरा, वादनातील किमया, सौदर्य कायम ठेवलेस
चाळीस वर्षांचा हा कला प्रवास अनुभवलास
पारदर्शीपणा जपत
मनमोकळा संवाद करत राहिलीस
सूरांची संगत सतत मनात घर करुन ठेवलीस
श्रध्देने, रियाजाने आणि चिकाटीने वाद्यावर हुकूमत कमावलिस
असाच सूरांचा सुरेल संसार सुरु ठेवलास
वयाची पन्नाशी आली तरी तोच भाव मनात राखलास
निष्काम कर्मयोग अखंड करत राहिलीस
निकोप आणि सुद्ढ वातावरणात स्वतःला घडविलेस
अशीच सुरांची परंपरा राखत स्वतःचे नाव रेखाटत रहा
हातातल्या बो मधून जसा स्वर तयार करतेस
तसाच सच्चा सूर गळ्यातून..शब्दातून निघू देत
निगर्वीपणा जपत... साधेपणा कायम ठेव
पैशापेक्षाही वेळेला आणि कलेला महत्व दे...
सुखाचा क्षय कधीच होणार नाही....


सुभाष इनामदार..२.११.२०११

Tuesday, September 13, 2011

रोज नवीन चाल लावणारे गुरू


-गजाननराव वाटवे

काही दिवसांपूर्वी सौ. बिंदी शहा या गुजराथी भाषिक गायिकेचा मराठी सुगम संगातीचा कार्यक्रम पुण्याच्या निवारा इथल्या सभागृहात संपन्न झाला. ज्येष्ठ व्हायोलिन वादक श्री. भालचंद्र देव यांच्या त्या शिष्या. गेली दहा वर्षे त्या मराठी सुगम संगीताचे शिक्षण घेत आहेत. मराठीच गीते शिकण्याची त्यांची ही जिद्द खरोखरीच कौतुकास्पद आहे.

मराठी शब्दांचे उच्चार आणि स्वर तसेच तालाचे ज्ञान यात अजून नक्कीच खूप सुधारणा होणे आवश्यक आहे. पण वयाच्या ६२ व्या वर्षी दोन तासांचा एक कार्यक्रम करायची जिद्द बाळगून त्या मेहनतीने तो सादर करतात हेच खूप. अमराठी शिष्याकडून मराठी गाणी तयार करून घेणारा गुरूही तेवढ्याच जिद्दीचा.

मलाही गाण्याची आवड असल्यामुळे ज्येष्ठ भावगीत गायक गजाननराव वाटवे (आण्णा) यांच्याकडे वर्षभर मी गाणं शिकले. त्यामुळे मीही या कार्यक्रमात व्हायोलिनची साथ तर केलीच पण चार गाणीही म्हटली.

माझ्या अंगभूत गायन केलेला प्रोत्साहन आणि मार्गदर्शकही लाभले ते वाटवे. मला अजूनही आठवतयं. मी प्रथम आण्णांकडे जेव्हा मला तुम्ही गाणं शिकवाल का...असं विचारायला गेले. तेव्हा ते म्हणाले, तू व्हायोलिन वाजवते आहेस म्हणजे मनात गातेसच. तेच फक्त मोठ्यानं म्हणायचे. त्यात भाव ओतून कसे गायचे हे मी तुला नक्कीच शिकवीन...
आणि त्यांनी मला बरीच अप्रचलित आणि प्रचलित अशी दोन्ही प्रकारची गाणी शिकविली.
जी गाणी ऐकण्यासाठी लोक प्रचंड संख्येने यायचे ती लोकप्रिय गाणीही मी त्यांच्याकड़ून शिकले.
कसा ग गडे झाला, कुणीही पाय नका वाजवू, फांद्यावरी बांधिले, मैत्रीणींनो सांगू नका नाव घ्यायला, मोहूनिया तुजसंगे, यमुनाकाठी ताजमहाल ....अशी कितीतरी गाणि त्यांना मला नोटेशन देत शिकविली.
ते म्हणायचे, यातल्या कोणत्याही गाण्याची एखाद्या ओळीची चाल जर विसरली तर तू ते नोटेशन व्हायोलिनवर वाजवून बघ म्हणजे तुला लगेच कळेल.

मी जेव्हा त्यांच्याकडे शिकत होते, तेव्हा आण्णांचे वय जवळपास ८०च्यावर असेल. पण मी दुपारी ४ वाजता ऑफिस संपल्यावर गेले तरी ते हार्मोनियम काढून नवीन चालीं बांधत बसलेले असायचे. मी त्यांना सांगायची की आण्णा, तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर मी पाच वाजता क्लासला येईन. त्यावर ते म्हणायचे, रोज एक तरी नविन चाल बांधली गेली पाहिजे असं ठरवलयं मी, त्याशिवाय झोप येत नाही...हे ऐकून मी मनात म्हटलं की, या वयात सुध्दा किती हा निग्रह आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती...

अशा मोठ्या लोकांकडून आपण संगीताचेच नाही तर त्यांचा निग्रह, जिद्द, समोरच्या माणसाला शिकविण्याची हाटोती, निगर्वीपणा, संगीतावरची निष्ठा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, त्यांचे विचार....असे कितीतरी.... यापैकी थोडेतरी आपणास घेता आले तर किती बरे...

माझा योग चांगला यामुळेच केवळ मला ते थोडा काळ का असेना पण गुरू म्हणून लाभले.. भाग्य माझं.
संगीताचे शिक्षण ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. त्यामुळे गाण्यात शिकविलेल्या काही गाष्टींचा उपयोग मला व्हायोलिन वादनातही खूपच झाला. त्यामुळे व्हायोलिनवर गाणी वाजविताना त्यात गाण्यातला भाव अधिक चांगला दिसू लागला असावा असे वाटते.

आणखी एक गोष्ट मी करावी अशी आण्णांची खूप इच्छा होती. ती म्हणजे,व्हायोलिन वाजविताना गायचे. पण ही गोष्ट खूपच अवघड आहे. पण मी एक तरी गाणे अशा पध्दतीने नक्कीच सादर करण्याचा प्रयत्न करेन. त्या दृष्टीने माझा सध्या रियाज सुरू आहे. गुरूच्या कृपेने तेही होईल नक्की.


सौ. चारुशीला गोसावी, पुणे

Thursday, August 25, 2011

पाच नमस्कार




पहिला नमस्कार करितो देवाला
घातले जन्माला त्याने मज..
दुसरा नमस्कार आईला नेमाने
वाढविले जिने प्रेमे मज..
तिसरा नमस्कार पितयाचे पायी
ठेवीन मी डोई त्यांचे चरणी..
चौथा नमस्कार गुरूजी तुम्हाला
शिकविले मला तुम्ही प्रेमे...
पाचवा नमस्कार जन्मभूमी तुला
वाहिन देहाला तुझिया चरणी...

Wednesday, August 24, 2011

सुरेल प्रवास ७५ वर्षांचा


नानांचा जन्म मुंबईचा. दामोदर चिंतामण देव, हे नोकरीनिमित्त मुंबईत आले होते. ते म्युनसिपाल्टीच्या शाळेत संगीत शिकवित असत. ते गाण्याबरोबरच हार्मोनियमही वाजवित असत. प्रसिध्द व्हायोलिनवादक पं. गजाननबुवा जोशी यांचे वडील पं. अनंत मनोहर जोशी यांचे ते शिष्य. त्यांना थोडे व्हायोलिनही वाजवता येत होते. त्यामुळे घरातील संगीताच्या वातावरणामुळे नानांनाही संगीताची गोडी लागली. यामुळेच वयाच्या ११ व्या वर्षी ते व्हायोलिन शिकू लागले.

दामोदर चिंतामण देव नोकरी संपल्यावर नाना पुन्हा चिंचवडला आले. (तसे हे देव कुटुंब चिंचवडच्या मोरया गोसावीच्या कुळातले. कामानामित्त मुंबईला जरी गेले तरी पुन्हा परतोनी माघारी म्हणजे चिंचवडला स्थिरावले) शालेय शिक्षण पूर्ण झाल्य़ावर आजोंबांकडे व्हायोलिनचे धडे घेणे सुरूच होते. वाणिज्य शाखेचे पदवी घेतल्यावर त्यांनी नानांना पं. गजाननबुवांकडे व्हायोलिन शिकण्यासाठी पाठविले.

रोज दहा तास, असे जवळजवळ तीन वर्षे डोंबिवलीत बुवांकडे व्हायोलिनचे धडे गिरविले. बुवांची शिस्त अतिशय कडक. कोणत्याही बंदिशी किंवा स्वररचना लिहून घ्यायच्या नाहीत. हा दंडक. घरी गेल्यावर त्या आठवून त्याचा रियाज करायचा... हे विद्येचे तंत्र. बुवांच्या या धाकामुळे व्हायोलिनशी जवळीक अधिक झाली.. बुवांच्या सहवासामुळे त्यांचे खास गायकी अंगाने व्हायोलिन वादनाची कला अवगत झाली. त्यात ते माहिर . तबल्याच्या बोलाचेही तिथे शास्त्रोक्त शिक्षण मिळाले... एकूणच गायकी अंगाने वादन आणि तेही तबल्याच्या लयीत वाजविण्याची कारागिरी सहजी प्राप्त झाली.

पुण्यात टेलिफोन खात्यात नोकरीचा कॉल आला..आणि नाना खुद्द पुण्यात दाखल झाले. पुण्यात नोकरी आणि व्हायोलिन दोन्ही गाष्टी एकत्रच सुरू झाल्या. पुण्यात पं. नागेश खळीकर, बबनराव कुलकर्णी, धुंडिराज मराठे यांचेकडेही नानांनी संगीताचे शिक्षण घेतले. पं. गजाननबुवांनी शिकविलेल्या व्हायोलिनच्या विद्येत पुरते प्राविण्य आल्यावर मग नानांनी रेडीओची परिक्षाही यशस्वीपणे पास केली. पुण्यात आलेल्या ६२च्या पुराने राहते घर कोलमडून गेले. गोखलेनगरला संसाराचा पुन्हा मांड मांडला. पत्नीला (सौ. निला भालचंद्र देव) गाण्याची आवड .त्या नानांच्या कार्यक्रमांना तंबो-याची साथ करत. त्या भक्तिगीते आणि अभंग छान म्हणतात

त्यांचा पहिला कार्यक्रम १९६३साली रेडिओवर प्रथम झाला . त्यानंतर घरी रेडिओ विकत आणला गेला. पत्नीने घरातली सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळली. सर्व जबाबदा-या आनंदाने, समाधानाने पार पाडल्य़ा. नाना घरात व्हायोलिनच्या शिकवण्या घेत असत. कार्यक्रमांना साथ करण्यासाठी बाहेर जात असत.

आज वयाच्या पंच्याहत्तरीतही नानांचा वक्तशिरपणा आणि शिस्त तशीच कायम आहे. पण जेवढे ते कठोर शिक्षक तेवढेच समोरच्याचे कौतुकही ते मनापासून करतात..

आपल्या इतक्या वर्षांच्या सुरेल प्रवासात त्यांनी कधीही प्रसिध्दीची किंवा कुठल्य़ाही पुरस्काराची अपेक्षा कधीच धरली नाही. आठ ते सत्तर वयोगटातल्या कितीतरी जणांनी नानांकडे शिक्षण घेतले आहे. आजही घेत आहेत.

पण व्हायोलिन हे फार अवघड वाद्य असल्यामुळे शिकायला येणारे फार चिकाटीने ते शिकत नाहीत..अर्धवट सोडून जातात ही त्यांची खंत आहे.

मितभाषी आणि तेवढेच मिश्किल ही त्यांची स्वभाववैशिष्ठ्ये सांगता येतील. ते तसे मितहारीपण असल्यामुळे मोजकाच आहार घेऊन सतत उत्साही असणारे आमचे नाना अजुनही बसने प्रवास करून घरोघऱी शिकवण्या घेण्यासाठी तर जातातच पण गेली ४० वर्षे शनिपारच्या भारत गायन समाजात संगीत शिक्षक म्हणून आजही कार्यरत आहेत. अजूनही कोणत्याही कार्यक्रमालाच काय पण तालमिंनाही वेळेवर हजर असतात.

त्यांचा हा संगीताचा वसा मी चारूशीला गोसावी ,नातू रविराज( तबला) आणि नात मधुरा (हार्मांनियम) यांनी पुढे न्यायचा प्रयत्न केला आहे.

निर्मळ मनाचे.. कोणत्याही कलेच्या राजकारणापासून अलिप्त असलेले.. व्हायोलिनवरची निष्ठा कायम ठेवणारे... ते वादनाचे धडे पुढच्या पिढीला शिकविणारे...पं. भालचंद्र देव... त्यांना आयुष्याची स्वर-संगत अशीच अखंड लाभत राहो.. कला आणि कलावंत दोघांनाही याचा लाभ होवो...हिच शुभकामना.


-चारूशीला गोसावी

अस्सं सासर सुरेख बाई...



महिन्याभरात श्रावण येईल. मुली, महिला आणि नव्याने लग्न झालेल्या नवरीकडे मंगळागौर पूजली जाईल. आणि त्यातल्या भोंडल्यात हे नक्की म्हटले जाईल..
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोंनी मारीतं....
ऐकायला या भोंडल्याच्या ओळी चांगल्या वाटतात. भोंडला म्हणणा-या मुली हासून वेळ मारून नेतात.. पण मला मात्र सासरचा अनुभव अतिशय चांगला मिळाला . म्हणूनच तो शब्दात मांडायचा हा प्रयत्न केला आहे.
मुलगी सासरी आली की, ती सतत ताणतणावाखाली. घरातल्या मोठ्या माणसांच्या दबावाखाली . मान खाली घालून वावरत असे..पण मला मात्र सासरी आल्यानंतर माहेरची आठवणही होऊ नये इतके प्रेमळ सासू-सास-यांकडून लाभले. आणि मी सतत अस्सं सासर सुरेख बाई ..म्हणत त्या घरात रममाण झाले. माहेरून व्हायोलिन वादनाच्या कलेचे रोप घेऊन आले आणि सासरी त्याचा वटवृक्षात रुपांतर झाले असे म्हटले तर ते वावगे ठरू नये..
मुलगी सासरी आली की, त्या घरातल्या रीतीभाती समजून घेऊन, घरातल्या माणसांचे स्वभाव ओळखून त्या घराला समजून घेत हळूहळू त्या घरात रुळते. मी माझी कला घेऊन त्या घरात आले. आणि सर्वांना कलाकार सून मिळाली म्हणून खूप आनंद झाला.
तुम्हाला सागते..माझ्या यजमानांनी तर मला दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहूनच पसंत केले. मग काय कलाकार बायको मिळल्याच्या त्यांना केवढा अभिमान. तो आजही आहे. ते तर सतत माझ्या पाठीमागे खंबीर उभे असतात. माझे दीर, जाऊ, नणंदा या सर्वांनाही माझ्या कलेचे काय कौतूक केले . ते सारेच माझ्या कलेला नेहमीच देतात आजही...
आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना समजावून घेऊन, सर्वांच्या आवडी-निवडी जपून सगळे सण, समारंभ, वाढदिवस खूप छान त-हेने साजरे करतो. सासू-सासरे जुन्या वळणाचे असल्यामुळे सुरवातीला थोडे मतभेद झाले. वादही झडले. पण आम्ही आणि त्यांनी दोघांनीही काही गोष्टींशी तडजोड करून त्यातून सुवर्णमध्य काढून पुढे गेलो. कोणत्याही गोष्टी जास्त विकोपाला जाणार नाहीत याची खबरदादारी घेतली. माझी थोरली जाऊ आणि मी तशा एकाच कार्यालयात . म्हणून का म्हणाना आमचे नाते बहिणीसारखे बनले. टिकले. वाढले. कायम राहिले.
माझा कुठेही कार्यक्रम असला तर ही सारी सासरची माणसे कौतूकाने आवर्जून हजर राहतात. दाद देतात. सारी मदत करतात.
आम्हा दोघी सुनांना सासूबाईंनी मुलाप्रमाणेच वागवले. आमच्यावर त्यांचे खूप प्रेम होते. आमच्या मुलांनाही त्यांनी अतिशय प्रेमाने सांभाळले. त्यामुळेच तर आम्हाला नोकरीसाठी बाहेर पडताना कधीच मुलांची काळजी करावी लागली नाही. मुलांनाही आजी- आजोबांचे प्रेम भरपूर मिळाले. सहवास मिळाला. त्यांच्यावर चांगले संस्कार झाले.
आजकाल ब-याच मुलींना एकत्र कुटुंब नको असते पण एकत्र कुटुंबाचे अनेक फायदे मुलींनी नक्कीच पाहिले पाहेजेत.
अशा माझ्या प्रेमळ हौशी, संगीतप्रेमी सास-यांना नुकतीच ११ जूनला देवाज्ञा झाली..पण त्यांचे आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी असतील याची खात्री आहे.
असचं सासर सगळ्या मुलींना मिळावे. त्यांनी ते जपावे. वाढवावे. संस्कार हेच धन पुढच्या पुढीपर्यंत द्यावे यासाठी कसोशिने प्रयत्न करावा...
अखेरीस मी म्हणेन...अस्सं सासर सुरेख बाई...सर्वांना मिळावे.....




सौ. चारूशिला गोसावी,
व्हायोलिनवादक, पुणे
मोबा..९४२१०१९२९९
ई.मेल-chrusheelagosavi@gmail.com