Total Pageviews

Thursday, March 29, 2012

व्हायोलिनच्या सुरांत रसिक मंत्रमुग्ध


व्हायोलिनच्या सुरांतून "चांदणे शिंपीत जाशी', "ऐन दुपारी यमुना तीरी' या मराठीबरोबरच "आईऐं मेहरबॉं', "ये रातें ये मौसम नदी का किनारा' अशी लोकप्रिय हिंदी गीते सादर होत असताना हा श्रवणानंद लुटणाऱ्या रसिकांनी नकळत त्यात आपले स्वर मिसळले. चारुशीला गोसावी यांच्या गायकी अंगाच्या वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले आणि तीन दशकांची कारकीर्द उलगडताना "आम्ही चालवू हा पुढे वारसा' या काव्यपंक्तींची प्रचिती शुक्रवारी आली.

हिंदी, मराठी गीतांबरोबरच गोसावी यांनी सादर केलेल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विविध रचनांनाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निमित्त होते, भरत नाट्य संशोधन मंदिर सांस्कृतिक मंचातर्फे आयोजिण्यात आलेल्या "स्वरसाधना' या पं. भालचंद्र देव यांच्या कन्या आणि शिष्या चारुशीला गोसावी यांच्या व्हायोलिन वादन मैफलीचे. संगीत साधनेचा तीस वर्षांचा प्रवास त्यांनी व्हायोलिन वादन आणि गायनातून उलगडला.

गोसावी यांनी राग मारुबिहागने मैफलीला सुरवात केली. यानंतर पं. गजाननबुवा जोशी यांच्या वादन शैलीनुसार श्री रागातील रचना, पं. श्रीधर पारसकर यांची गोरख कल्याण रागातील आणि पं. व्ही. जी. जोग यांच्या वादन शैलीतील देस रागातील गत सादर करून रसिकांची दाद मिळविली. मैफलीच्या दुसऱ्या भागात त्यांनी सादर केलेली लोकप्रिय मराठी आणि हिंदी गीते, लावणी, भावगीते आणि नाट्यगीतांना वन्समोअरची फर्माईश मिळाली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी गजानन वाटवे आणि मंदाकिनी चाफळकर यांनी संगीतबद्ध केलेली निवडक गीते सादर केली. रविराज गोसावी यांनी तबल्यावर आणि दीप्ती कुलकर्णी यांनी संवादिनीवर साथसंगत केली. सुभाष इनामदार यांनी मैफलीचे सूत्रसंचालन केले.