swarbahar
स्वरांवर आयुष्यभर प्रेम करताना बहारदार संसार करणारी एक मनस्वी कलावंत
Total Pageviews
Thursday, March 28, 2024
व्हायोलीन वादनाची चाळिशी
Friday, November 6, 2020
स्वरानंदचा सुवर्णमहोत्सव
नोव्हेंबर ७ ला "स्वरानंद "संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता होत आहे..
त्या निमित्ताने या संस्थे विषयीची कृतज्ञता...
आपल्या रंगमंचीय कार्यक्रमाची सुरवात एखाद्या नावाजलेल्या संस्थेमधून होणं ही गोष्ट कोणत्याही
कलाकाराला आनंद देणारीच असते. माझे वडील श्री. भालचंद्र देव हे स्वरानंद संस्थेमध्ये अनेक वर्षे व्हायोलिन वादक म्हणून त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होते. 'मंतरलेल्या चैत्रबनात', या कार्यक्रमातही वडील व्हायोलिनची साथ करीत. संस्थेत संगीताची बाजू सांभाळणारे प्रा. हरिष देसाई आणि व्यवस्थापनाची बाजू सांभाळणारे प्रा. प्रकाश भोंडे हे होते.
या कार्यक्रमाची तालीम देसाई सरांच्या घरी होत असे. कधी कधी मी ही तालीम बघण्यासाठी वडीलांबरोबर जात असे. अत्यंत शिस्तीत आणि वेळवर सुरू होणा-या तालमीला सर्वजण वेळवर हजर असत. मलाही त्या गाण्यांची गोडी वाटू लागली. व्हायोलिनसाठी आठ कलाकार होते. मलाही कार्यक्रमात वाजवावे असे वाटले. मग मी त्या सर्व गाण्यांचे म्यूझिक पिसेस घरी तालीम करून बसविले आणि एक दिवशी देसाई सरांना वाजवून दाखविले... आणि माझा 'स्वरानंद' या एका नावाजलेल्या संस्थेमध्ये प्रवेश झाला. खूप आनंद झाला.
संस्थेच्या १९८३ ते १९९८ अशी जवळजवळ १५ वर्षे मी 'स्वरानंद ', संस्थेच्या अनेकविध कार्यक्रमांना व्हायोलिनची साथ केली. त्यात सावरकरांवरील गीतांचा - 'नमन मृत्यूंजयवीरा'. सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यांचा -'रिमझिम स्वरांची'. पु .लं च्या गाण्यांचा -'पुलकित गीते'. शांताराम आठवलेंच्या गीतांचा -'आधी बीज एकले'. आणि बाबुजींच्या गाण्याचा -'तुझे गीत गाण्यासाठी..'असे काही निवडक कार्यक्रम.
गदिमांच्या 'मंतरलेल्या चैत्रबनात ..' या कार्यक्रमाचे तर जवळपास १४२ कार्यक्रम मी वाजविले. 'मंतरलेल्या चैत्रबनात'..चे पुण्यात आणि बाहेरगावी असे सतत कार्यक्रम सुरु होते. 'स्वरानंद'च्या प्रत्येक कार्यक्रमाला तुडूंब भरलेले सभागृह कार्यक्रमाचा दर्जा दाखवून देत होते. 'प्रभात समयो पातला.. या गाण्यापासून सुरु झालेल्या कार्यक्रमाची 'वेद मंत्राहून आम्हा, वंद्य वंदेमातरम'.. या गीताने सांगता होत असे.. आणि प्रेक्षक पुढच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पहात असत.
श्री. रमाकांत परांजपे, गिरीश जोशी, अनुराधा मराठे, प्रा. अरूण नूलकर, प्रमोद रानडे, श्रीपाद उंब्रेकर, दरेकर, वीणा जोगळेकर, मीनल रत्नपारखी, प्रतिभा इनामदार, सुनिती केळकर,संजय पंडित,लीलाताई कानडे,शैला मुकुंद, सुधीर गाडगीळ, रंजना पेठे..किती नावे घेऊ.. असे सर्व कलाकार या कार्य़क्रमात असत. अत्यंत दर्जेदार अशा या कार्यक्रमांमधून साथ करण्याची संधी मिळाली हे खरोखरच मी माझे भाग्य समजते.
अशा या 'स्वरानंद' संस्थेच्या सुवर्णमहात्सवी वर्षाची सांगता येत्या ७ नोव्हेंबर रोजी होत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या संस्थेमार्फत होत असतात. दरवर्षी गुणी कलाकार निवडून त्यांना ' स्वरानंद' पुरस्कारही दिले जातात. श्री. प्रकाश भोंडे हे गेली ४८ वर्षे संस्थेचे काम पहात आहेत. कोणतीही संस्था वर्षानुवर्ष चालविणे हे खरोखरच अवघड काम आहे. संस्थेच्या कार्यकारीणावर अजून बरेच मान्यवर लोक काम करतात. त्यांनाही अनेक शुभेच्छा. संस्थेचे कार्यक्रम, उपक्रम असेच सुरु रहावेत आणि रसिकांना आनंद मिळत राहो, हिच प्रार्थना.
माझ्या रंगमंचीय कार्यक्रमाची सुरवात करणा-या या 'स्वरानंद', या संस्थेविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते आणि सुरांचा आनंद देणा-या या 'स्वरानंद'ला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते.
- सौ. चारूशीला गोसावी, पुणे
( व्हायोलीन कलाकार)
Sunday, July 5, 2020
पं. गजाननबुवा जोशी यांचे स्मरण..
गायन वादनाचार्य पं. गजानन बुवा जोशी
प्रख्यात गायक आणि व्हायोलिन वादक पं. गजानन बुवा जोशी यांची २८ जून रोजी पुण्यतिथी होती आणि गुरुपौर्णिमा..या निमित्त त्यांचे शिष्य .श्री भालचंद्र देव यांच्या कन्या सौ चारुशीला गोसावी यांनी वाहिलेली आदरांजली...
पं .गजानन बुवा जोशी यांचा जन्म ३० जानेवारी १९११ रोजी मुंबई येथे एक संगीत कुटुंबात झाला.त्यांचे आजोबा मनोहर जोशी धृपद-धमार गात असत.त्यांचे वडील अनंत मनोहर जोशी(अंतुबुवा)यांनी बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचेकडे ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते.गजानन बुवा लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले त्यामुळे आई,वडील,गुरू या तिन्ही नात्यांनी अंतुबुवानी अतिशय प्रेमामे गजानन बुवांचे लालन पालन केले.अंतुबुवांचे 'श्री समर्थ संगीत गायन-वादन विद्यालय'१९०७ पासून मुंबईत सुरू होते त्यामुळे चोविसतास बुवांच्या कानावर गायन वादन पडत असे.त्यामुळे संगीताचे उत्तम संस्कार बुवांवर झाले.
सातारा येथील औंध संस्थानात अंतुबुवा दरबार गायक म्हणून होते. आठ वर्षाच्या गजाननाला ते आपल्या बरोबर संस्थानात नेत असत.संस्थानाचे राजे स्वतः कीर्तनकार होते आणि त्यांना व्हायोलिन वाद्याची खूप आवड होती,त्या वाद्याची साथ कीर्तनात हवी असे त्यांना वाटत असे.एक दिवस त्यांनी या छोट्या गजाननाच्या हाती व्हायोलिन दिले आणि सांगितले की तूच हे वाद्य जाणून घ्यायचे आणि माझ्याबरोबर कीर्तनाची साथ करायची.वाद्याची काही माहिती नसताना आणि कोणीही गुरू नसतांना बुवा स्वतःच गुरू बनले,कठोर मेहनत घेतली आणि तीन तीन तास कीर्तनाला साथ करू लागले.
बुवांनी वडिलांकडून आणि वझे बुवांकडून ग्वाल्हेर गायकीचे शिक्षण घेतले,विलायत हुसेन खा यांच्या कडून आग्रा घराण्याची गायकी आणि भुर्जी खा यांच्या कडून जयपूर-अत्रौली घराण्याची यायकी अशा तिन्ही गायकी आत्मसात केल्या. विनायक घांग्रेकर कडून तबल्याचे शिक्षण घेतले.
तिन्ही घराण्यांचे गायन शिकल्यामुळे त्यांच्या वादनातही तिन्ही घराणी दिसू लागली.संपूर्ण देशात अनेक सभा संमेलनांमध्ये गजानन बुवांचे व्हायोलिन वाजू लागले आणि या वाद्याला मैफिलीचा दर्जा प्राप्तझाला .व्हायोलिन चे तंत्र,मंत्र,वादन पद्धत,लावण्याची पद्धत याची त्यांनी स्वतःच निर्मिती केली.त्याचे विदेशीपण काढून टाकले आणि त्याला स्वदेशी वाद्य बनवले.भारतीय संगीतात त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि वादन क्षेत्रात एक नवीन दालन खुले केले.अनेक स्व-रचना केल्या.आठ वर्षाचे असताना व्हायोलिन हातात घेतले ..ते १५-१६ वर्षाचे असल्यापासून कार्यक्रम वाजवण्यास सुरुवात केली आणि आयुष्यभर व्हायोलिन वाजवत राहिले आणि जनमानसाच्या सिंहासनावर अनभिषिक्त सम्राट म्हणून विराजमान झाले.
मानवी गळ्याशी साम्य असणारे वाद्य म्हणून प,सा,प,सा या पद्धतीत व्हायोलिन लावायला सुरुवात केली.लयकारी हे त्यांच्या वादनाचे बलस्थान होते.मींड वादनासाठी ते एकाच बोटाचा वापर करीत.गायकी अंगाने वादन करून त्यात लालित्य आणि चैतन्य निर्माण करणे ही बुवांची खासियत होती.भारतातील अनेक मोठं मोठ्या तबालजींनी गजानन बुवाना गायन आणि वादनात साथ केली.उस्ताद अहमद जान थिरकवा तर त्यांची स्तुती करताना म्हणायचे'"हिंदुओमे एक ऐसा तालिया बम्मन निकला है की जिसकी साथ संगत करना बहुत मुश्किल है।हमने आज तक बहुत कलाकारोंके साथ बजाया लेकीन ऐसा बेडर कलाकार आज तक नहीं देखा।"रेडिओ संगीत संमेलनात खां साहेब थिरकवा आणि पं. सामता प्रसाद या दोन्ही तबालजींनी एक वेळी बुवांना साथ केली आणि दोघां बरोबर बुवांनी अफाट वादन केलं.सर्व नामवंत तबलजी त्यांना 'लयकारीचा बादशहा 'म्हणत असत.
या क्षेत्रात बुवांना अनेक पुरस्कार,सन्मान प्राप्त झाले.गायन आणि वादन या दोन्ही क्षेत्रात बुवानी अनेक उत्तम शिष्य तयार केले.डॉ अशोक रानडे,पं उल्हास कशाळकर,डॉ वीणा सहस्त्रबुद्धे,विदुषी जयश्री पाटणेकर,पंडिता पद्मा तळवलकर,पं श्रीधर पार्सेकर,मधुकर जोशी,त्र्यंबक तारे,गजानन कर्नाड,शुभदा पराडकर,पं जी आर निंबर्गी,व्ही जी जोग,शंकरराव बिनिवाले,श्री भालचंद्र देव आणि असे अनेक शिष्य तयार केले.सर्व शिष्यांना त्यांनी मुलाप्रमाणे समजून विद्यादान केले.अशा या थोर कलावंताला २८ जून १९८७ रोजी देवाज्ञा झाली..
गेली अनेक वर्षे त्यांचे शिष्य श्री भालचंद्र देव आणि आम्ही व्हायोलिन वादक त्यांचे स्मरण करून आमच्या वादनातून त्यांना आदरांजली अर्पण करीत आहोत.परंतु या वर्षी अचानक आलेल्या या करोनाच्या संकटामुळे आम्ही हा कार्यक्रम करू शकलो नाही त्यामुळे या लेखाद्वारे आम्हा सर्वांतर्फे भावपूर्ण आदरांजली.. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्मरण करून त्यांना वंदन करीत आहोत..
- चारुशीला गोसावी, पुणे
Wednesday, January 8, 2020
गाणं मनातलं...
आपल्या मनातल्या घरात खरं तर खूप काही गाणी असतात. काही गाणी ह्दय हेलावून टाकणारी.. काही त्यातल्या संगीतामुळे प्रसन्न वाटणारी. काही शब्दांमध्ये गुंतून ठेवणारी. तर काही शब्द, ताल, सूर, भावना या सर्वांमुळे मनातली झालेली.
या सर्व दृष्टीनं परिपूर्ण असा चित्रपट ..बाळा गाऊ कशी अंगाई... कथा, संगीत दिग्दर्शन आणि कसलेले कलाकार..या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय सुंदर आहेत. पण त्यातील ..माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते.. संसार मांडते....हे फारच अप्रतिम गीत. कितीही वेळा ऐकलं तरी प्रत्येक वेळी त्यात काहीतरी नविन सापडतं... जगदीश खेबुडकर यांच्या अलौकिक लेखणीतून उतरलेले हे एक भावपूर्ण गीत. आणि एन दत्ता.. यांचे मधुर संगीत लाभलेल हे गाणं मनात घर करून राहतं.
मी पाहते तयांना ही लोचने मिटून
माझ्याच सावलीला मी जवळ ओढते
घरी दारी नटून थटून उभी राहिलेली ही सुखाची रूपं मी डोळे बंद करून अनुभवते ..ही कल्पना किती सुंदर शब्दात खेबुडकरांनी मांडली आहे. आशाताई काळे आणि विक्रम गोखले यांच्या सुंदर अभिनयाने नटलेलं हे गीत आशाबाईंच्या आवाजाने अधिकच खुलतं. उस्ताद रईस खान यांची सतार आणि तबल्याचा दमदार ठेका मनाचा ठाव घेतात. शब्दांच्या उच्चारातूनच कळलेले भाव, शब्दांनी, सुरांची कुठेही न झालेली ओढताण. अत्यंतl तरल आणि हळूवार भावना या गाण्यातून जाणवते. आशाताई काळे यांच मोहक रूप खूपच सुखावून जातं.
ठेऊ कशी कुठे ग मी बावरून गेले..
माझ्या खुळ्या सुखाला मी आज भेटले..
हातात सौभाग्यदान पडलेली ही नायिका इतकी बावरून जाते की , एवढं सुख आज मला भेटणार आहे..पण मी ती कुठे ठेऊ हेच कळत नाही..
असं हे मनातलं गाणं. गीतकाराच्या आणि संगीतकाराच्या उत्तम प्रतिभेचा साक्षात्कार घडविते.
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/xEfmND2kbXk" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>
- चारुशीला गोसावी.
Wednesday, April 4, 2018
सात व्हायोलिन वादकांनी वाहिली गजाननबुवा जोशी यांना स्वरांजली अर्पण
`सांस्कृतिक पुणे`च्या सहकार्याने पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयाच्या सभागृहात खास रसिकांसाठी आयोजित केली होती.
![]() |
वैष्णवी काळे.... राग बागेश्री
आणि धुन
|
![]() |
|
रजत नंदनवाडकर.. राग छायानट
आणि धुन
|
रजत नंदनवाडकर,
![]() |
|
डॉ. सौ. निलिमा
राडकर.. मारूबिहाग आणि शंकराभरणम्
|
डॉ. सौ. निलिमा राडकर,
![]() |
|
वसंत देव..राग
बिहाग
|
वसंत देव,
![]() |
|
देवेंद्र जोशी.. राग बागेश्री
आणि नरवर कृष्णासमान
हे नाट्यपद
|
देवेंद्र जोशी,
![]() |
|
अभय आगाशे.. राग रागेश्री
आणि एक
हिंदी चित्रपट गित
|
अभय आगाशे यांनी आपले स्वतंत्र शास्त्रीय वादन केले.
![]() |
|
सौ. चारुशीला गोसावी.. राग
गावती आणि किरवाणी
धुन
|











