Total Pageviews

Monday, January 23, 2017

संस्काराची श्रीमंती असणारी माझी आई..

देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने सौ. नीला देव यांना आदर्श माता हा पुरस्कार गुरूनाथ मुंगळे महाराज यांच्या हस्ते पुण्यात देण्यात आला..


माझी आई सौ. नीला भालचंद्र देव ( पूर्वाश्रमीची पुष्पा देशपांडे ). एक साधं, सोज्वळ व्यक्तिमत्व. मुंबईच्या चाळीत रहाणारी. एकत्र कुंडुबात वाढलेली. लहानपणीच आई-वडील यांचे छत्र हरपल्याने मामा-मामींनी सांभाळ केला.  चाळीतल्या दोन खोल्यांमध्ये पंधरा माणसं रहायची. पण अतिशय आनंदात. परिस्थितीने श्रीमंत नसली तरी संस्काराची श्रीमंती नक्कीत तिच्याकडे होती. लहानपणापासून आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायची सवय.
 लग्न ठरले ते ही एका अत्यंत साध्या आणि आर्थिक परिस्थिती बेताचीच असणा-या पुण्यातील भालचंद्र देव यांच्याशी. पुण्यात कसबा पेठेत मोटे मंगल कार्यालयात एकाच खोलीत आई-वडीलांबरोबर रहाणारे. लग्न झाल्यानंतरही  काही वर्षे एकत्र संसार सुरू होता.सासूबाईंना अर्धांगवायू झालेला. वरच्या मजल्यावर रहात असल्यामुळे पिण्याचे पाणीही खालून भरावे लागे.

६१ला पुण्यात पूर आला तेव्हा घराची अवस्था खूपच वाईट झाली. मग पूरग्रस्त म्हणून गोखलेनगर येथे चाळीमध्ये जागा मिळाली. त्यावेळी तिथेही फारशी वस्ती नव्हती. शेजारी- पाजारी पण कोणी नव्हते. मी फार लहान. वडीलांची टेलीफोन खात्यातील नोकरी. ते सायकलवर कामावर जात असत. पावसाळ्यात तर तिथे इतकी बिकट परिस्थिती असायची की घरी येताना गुडघाभर चिखलातून वाट काढतच याव लागायचं.

अशीच काही वर्षे गेली. मी व माझा धाकटा भाऊ आम्ही थोडे मोठे झाल्यानंतर संसाराला हातभार म्हणून आईने घरातच बालवाडी सुरू केली.त्यावेळी शाळेची फी होती फक्त ६ रूपये आणि सुरवातीला शाळेत फक्त सहा मुले होती. हळूहळू मुलांची संख्या वाढली आणि ती १००वर गेली. आमच्या दोन्ही खोल्यांमध्ये मुलं बसायची. आमच्या शेजारच्या देशपांडे काकू आणि आई असा दोघींनी जवळजवळ ३० वर्षे नेटाने शाळा चालविली. त्यावेळी आत्तसारखी काही महागडी खेळणीही मुलांना देण्यासाठी आमच्याकडे नव्हती. पण केवळ गाणी आणि गोष्टींमधून चांगले संंस्कार करण्याचे काम तिने उत्तम रितीने केले.

मला असं आठवतच नाही की आईने स्वतःसाठी काही घेतलयं. आमच्याकडे आम्हा चौघांना कपडे ठेवण्यासाठी एकच कपाट होते. त्यातले चार कप्पे चौंघांसाठी. पण तिच्यासाठी असणारा एक कप्पाही पूर्ण साड्यांनी भरलाय असं कधीच दिसलं नाही.सतत आमच्यासाठी धडपडणारी आमच्या शाळा- कॉलेजच्या वेळा. वडीलांच्या कार्यक्रमांच्या वेळा सांभाळणारी. खाण्या-पिण्याची आबाळ होऊ न देणारी. अत्यंत काटकसरीत पण निगुतीने संसार कर्रणारी माझी आई  खरोखरच एक आदर्शच आहे.

घराला रंग द्यायला मदत करणारी. घराभोवती तारंचं कुंपण केले तर त्याच्या तारा लावायला मदत करायची. आमच्या घराला पत्र्याचं छप्पर होतं. पावसाळ्यात त्या पत्र्यांमधून कुठे कुठे गळायचं. मग त्या छिद्रांना डांबर लावायचं काम करावं लागायचं. शिवाय घरात धुणं आणि भांड्याचं काम असायचं. नवा संसार उभा करताना घरात पत्र्याचै फक्त चार डबे होते. पण हळूहळू एक एक वस्तू जमवत संसाराची घडी तिने व्यवस्थित बसविली. कधी कशाचा हव्यास केला नाही. कोणत्या गोष्टीची तक्रारही केली नाही की कशाचा बाऊही केला नाही. त्य़ा दोन खोल्या सुध्दा ती इतक्या टापटीप आणि छान ठेवायची की कोणीही आले तरी ...तुमच्या घरात किती प्रसन्न वाटतं.. असं म्हणायचे. तिथे जवळ जवळ ४० वर्षे आम्ही आनंदात राहिलो.

माझे वडीलही घरात व्हायोलिनचे क्लास घेत असत. त्यावेळी आई तंबो-्याची साथ करीत असे.
अशी ही माझी आदर्श माता आजही अत्यंत समाधानी आहे. अजुनही तिचे कपाट साड्यांनी भरलेले नाही पण मन मात्र समाधानाने आणि आनंदाने पूर्ण भरलेले आहे. विद्यादानाचे एक व्रत तिने अंगीकारले होते त्यामुळे त्या एका वेगळ्याच समाधानाचे हास्य तिच्या चेह-यावर दिसते. तिच्या शाळेत शिकलेली मुले आता चांगल्या पदांवर काम करत आहेत. रस्त्याने जातान जर कोणाी विद्यार्थाने आईला पाहिले तर तिथेच लगेच आईला ओळख सांगतात..बाऊ मी तुमच्या शाळेत होतो..आणि लगेच तिथेच नमस्कार करतात.



आईने नुकतीच वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आणि वडिलांनी ८० . अशा माझ्या आदर्श माता-पित्यांचा अमृत महोत्सव आणि सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा करण्याचे भाग्य मला मिळाले.

जीवेत शरदः शतम्




- सौ. चारूशीला गोसावी.
charusheelagosavi@gmail.com