Total Pageviews
Thursday, March 28, 2024
व्हायोलीन वादनाची चाळिशी
व्हायोलीन वादिका सौ. चारुशीला गोसावी यांनी आपल्या संगीत साधनेला चाळीस वर्षे पुरी केल्याच्या निमित्ताने पुण्यात ३१ मार्च २४ रोजी एस एम जोशी सभागृहात शास्त्रीय आणि सुगम संगीताच्या व्हायोलीन मैफलीचे..व्हायोलीन गाते तेंव्हा.. हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता खास रसिकांसाठी विनामूल्य आयोजित केला आहे..
त्यानिमित्त त्यानी आपल्या संगीत साधनेकडे असे मागे वळून पाहिले आहे..
वडील कै. पं. भालचंद्र देव यांचेकडे ९ व्या वर्षापासून व्हायोलीन वादन शिकण्यास मी सर्वात केली. पुढे बी. कॉम.आणि नंतर संगीतात एम.ए. चा अभ्यास सांभळून तसेच ३५ वर्षे दूरसंचार खात्यात bsnl मध्ये नोकरी आणि घर सांभाळून हा व्हायोलीन साधनेचा वसा तितक्याच नेटाने आणि धेय्याने कायम सुरू ठेवला.
१९८४ मध्ये स्वरानंद या संस्थेच्या मंतरलेल्या चैत्रबनात या कार्यक्रमात वडिलांच्या बरोबर व्हायोलीनची साथ करण्यासाठी तिथे जाऊ लागले आणि तीच माझ्या रंगमंचीय कार्यक्रमाची सुरवात होती.
पुढे स्वरानंद संस्थेच्या आधी बीज एकले, रिमझिम स्वरांची, पुलकित गीते, नमन मृत्यंजयवीरा,..असे अनेक कार्यक्रमात मी साथ केली. यामुळे माझ्या साथीचे अनेक मान्यवरांकडून कौतुकही झाले.
झलक..या संस्थेचे अनेक कार्यक्रमही पुढे वाजविले. इतर अनेक लहान मोठ्या कार्यक्रमात व्हायोलीनची साथ करण्याची संधी मला प्राप्त झाली..
हळूहळू माझी साधना सुरू राहिली..केवळ सुगम नाही तर..नाट्य संगीत आणि संगीत नाटके यांनाही व्यासपीठावर साथ करण्याची संधी मला लाभली.
शास्त्रीय वादनाचे वडिलांबरोबर आणि स्वतंत्र असे जवळजवळ १५०० कार्यक्रम सादर झाले असतील. सूरसिंगार, दादर माटुंगा कल्चरल सेंटर, गांधर्व महाविद्याय, खाँ साहेब अल्लादिय्या खाँ स्मृती समारोह, बांद्रा संगीत सभा, महाराष्ट्र मंडळ.. चेन्नई, गानवर्धन...पुणे, स्त्री वाद्य वादन महोत्सव, कुंदगोळ येथील सवाई गंधर्व महोत्सव अशा मानाच्या आणि प्रतिष्ठित ठिकाणी शास्त्रीय व्हायोलीन वादनाची संधी प्राप्त झाली.
सुप्रसिद्ध क्लारोनेट वादक बंडोपंत सोलापूरकर यांच्या बरोबर सहवादनाचे कार्यक्रम केले. दूरदर्शवरील एम २, जी २ तसेच साम वाहिनीच्या मधुरा कार्यक्रमात मुलाखती दरम्यान रसिकांना मंत्रमुग्ध करता आले.
याशिवाय bsnl मधील नोकरीत अखिल भारतीय स्तरावरील शास्त्रीय स्तरावरील स्पर्धेत सतत २२ वर्षे सुवर्णपदकाची कमाई करू शकले.
या माझ्या चालूच वर्षांच्या संगीत साधनेत कुंदगोळ येथील सवाई गंधर्व महोत्सवात वादन करायला मिळाले हा माझा पहिला पुरस्कार..त्यानंतर स्वामी हरिदास संगीत महोत्सवात सूर सिंगार सन्मान, देशस्थ ऋग्वेदी संस्थेचा संगीत सेवा पुरस्कार, ज्येष्ठ नागरिक संघाचा लता मंगेशकर पुरस्कार हे ही मला मोलाचे वाटतात.
माझ्या या संगीत साधनेत माझ्या घरातील लोकांचा उत्तम पाठींबा..आणि त्यांचे कौतुक ..मदत मोलाची वाटते.. त्यातही माझे पती राजय गोसावी यांची साथ फारच महत्वाची आहे.
सर्वात मोठी कौतुकाची थाप मायबाप रसिकांची लाभली..त्यांचे प्रोत्साहन मिळाले.
मी ..अभय आगाशे, नीलिमा राडकर आणि संजय चांदेकर सादर करीत असलेल्या रसिकप्रिया व्हिओलीना या कार्यक्रमात सहभागी होण्याची १५ वर्षे संधी मिळाली आहे..
अभिजित पांचभाई, आनंद माडगूळकर, यांच्या बरोबर गीतरामायणाचे कार्यक्रम भरपूर वाजविले.
तसेच लोकबिरादरी प्रकल्प, सियाचीनमधील ऑक्सिजन प्रकल्पासाठी कार्यक्रम करून निधी उभारण्याचा प्रयत्न केला.
अशा कार्यक्रमात आनंद देशमुख, विनया देसाई आणि नीरजा आपटे यांचे निवेदनाद्वारे सहकार्य मला मिळत गेले आहे.
गेली काही वर्षे मी चित्रकला छंद जोपासत आहे..त्यासाठी मला सुबोध कार्लेकर मला मार्गदर्शक लाभले आहेत.
माझे आई..वडील, संगीत क्षेत्रातील वडीलधारी मंडळी आणि रसिकांच्या आशीर्वादाने ही वाटचाल अशीच सुरू रहावी हीच इच्छा आहे..
आपली,
सौ.चारुशीला गोसावी,
पुणे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment