Total Pageviews

Sunday, July 5, 2020

पं. गजाननबुवा जोशी यांचे स्मरण..



गायन वादनाचार्य पं. गजानन बुवा जोशी

प्रख्यात गायक आणि व्हायोलिन वादक पं. गजानन बुवा जोशी यांची २८ जून रोजी पुण्यतिथी होती आणि गुरुपौर्णिमा..या निमित्त त्यांचे शिष्य .श्री भालचंद्र देव यांच्या कन्या सौ चारुशीला गोसावी यांनी वाहिलेली आदरांजली...


 पं .गजानन बुवा जोशी यांचा जन्म ३० जानेवारी १९११ रोजी मुंबई येथे एक संगीत कुटुंबात झाला.त्यांचे आजोबा मनोहर जोशी धृपद-धमार गात असत.त्यांचे वडील अनंत मनोहर जोशी(अंतुबुवा)यांनी बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचेकडे ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते.गजानन बुवा लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले त्यामुळे आई,वडील,गुरू या तिन्ही नात्यांनी अंतुबुवानी अतिशय प्रेमामे गजानन बुवांचे लालन पालन केले.अंतुबुवांचे 'श्री समर्थ संगीत गायन-वादन  विद्यालय'१९०७ पासून मुंबईत सुरू होते त्यामुळे  चोविसतास बुवांच्या कानावर गायन वादन पडत असे.त्यामुळे संगीताचे उत्तम संस्कार बुवांवर झाले.


 सातारा येथील औंध संस्थानात अंतुबुवा दरबार गायक म्हणून होते. आठ वर्षाच्या गजाननाला ते आपल्या बरोबर संस्थानात नेत असत.संस्थानाचे राजे स्वतः कीर्तनकार होते आणि त्यांना व्हायोलिन वाद्याची खूप आवड होती,त्या वाद्याची साथ कीर्तनात हवी असे त्यांना वाटत असे.एक दिवस त्यांनी या छोट्या गजाननाच्या हाती व्हायोलिन दिले आणि सांगितले की तूच हे वाद्य जाणून घ्यायचे आणि माझ्याबरोबर कीर्तनाची साथ करायची.वाद्याची काही माहिती नसताना आणि कोणीही गुरू नसतांना बुवा स्वतःच गुरू बनले,कठोर मेहनत घेतली आणि तीन तीन तास कीर्तनाला साथ करू लागले.

‌ बुवांनी वडिलांकडून आणि वझे बुवांकडून ग्वाल्हेर गायकीचे शिक्षण घेतले,विलायत हुसेन खा यांच्या कडून आग्रा घराण्याची गायकी आणि भुर्जी खा यांच्या कडून जयपूर-अत्रौली घराण्याची यायकी अशा तिन्ही गायकी आत्मसात केल्या. विनायक घांग्रेकर कडून तबल्याचे शिक्षण घेतले.

तिन्ही घराण्यांचे गायन शिकल्यामुळे त्यांच्या वादनातही तिन्ही घराणी दिसू लागली.संपूर्ण देशात अनेक सभा संमेलनांमध्ये गजानन बुवांचे व्हायोलिन वाजू लागले आणि या वाद्याला मैफिलीचा दर्जा प्राप्तझाला .व्हायोलिन चे तंत्र,मंत्र,वादन पद्धत,लावण्याची पद्धत याची त्यांनी स्वतःच निर्मिती केली.त्याचे विदेशीपण काढून टाकले आणि त्याला स्वदेशी वाद्य बनवले.भारतीय संगीतात त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि वादन क्षेत्रात एक नवीन दालन खुले केले.अनेक स्व-रचना केल्या.आठ वर्षाचे असताना व्हायोलिन हातात घेतले ..ते   १५-१६ वर्षाचे असल्यापासून कार्यक्रम वाजवण्यास सुरुवात केली आणि आयुष्यभर व्हायोलिन वाजवत राहिले आणि जनमानसाच्या सिंहासनावर अनभिषिक्त सम्राट म्हणून विराजमान झाले.


‌ मानवी गळ्याशी साम्य असणारे वाद्य म्हणून प,सा,प,सा या पद्धतीत व्हायोलिन लावायला सुरुवात केली.लयकारी हे त्यांच्या वादनाचे बलस्थान होते.मींड वादनासाठी ते एकाच बोटाचा वापर करीत.गायकी अंगाने वादन करून त्यात लालित्य आणि चैतन्य निर्माण करणे ही बुवांची खासियत होती.भारतातील अनेक मोठं मोठ्या तबालजींनी गजानन बुवाना गायन आणि वादनात साथ केली.उस्ताद अहमद जान थिरकवा तर त्यांची स्तुती करताना म्हणायचे'"हिंदुओमे एक ऐसा तालिया बम्मन निकला है की जिसकी साथ संगत करना बहुत मुश्किल है।हमने आज तक बहुत कलाकारोंके साथ बजाया लेकीन ऐसा बेडर कलाकार आज तक नहीं देखा।"रेडिओ संगीत संमेलनात  खां साहेब थिरकवा आणि पं. सामता प्रसाद या दोन्ही तबालजींनी एक वेळी बुवांना साथ केली आणि दोघां बरोबर बुवांनी अफाट वादन केलं.सर्व नामवंत तबलजी त्यांना 'लयकारीचा बादशहा 'म्हणत असत.


‌ या क्षेत्रात बुवांना अनेक पुरस्कार,सन्मान प्राप्त झाले.गायन आणि वादन या दोन्ही क्षेत्रात बुवानी अनेक उत्तम शिष्य तयार केले.डॉ अशोक रानडे,पं उल्हास कशाळकर,डॉ वीणा सहस्त्रबुद्धे,विदुषी जयश्री पाटणेकर,पंडिता पद्मा तळवलकर,पं श्रीधर पार्सेकर,मधुकर जोशी,त्र्यंबक तारे,गजानन कर्नाड,शुभदा पराडकर,पं जी आर निंबर्गी,व्ही जी जोग,शंकरराव बिनिवाले,श्री  भालचंद्र देव आणि असे अनेक शिष्य तयार केले.सर्व शिष्यांना त्यांनी मुलाप्रमाणे समजून विद्यादान केले.अशा या थोर कलावंताला २८ जून १९८७  रोजी देवाज्ञा झाली..


‌  गेली अनेक वर्षे त्यांचे शिष्य श्री भालचंद्र देव आणि आम्ही व्हायोलिन वादक त्यांचे स्मरण करून आमच्या वादनातून त्यांना आदरांजली अर्पण करीत आहोत.परंतु या वर्षी अचानक आलेल्या या करोनाच्या संकटामुळे आम्ही हा कार्यक्रम करू शकलो नाही त्यामुळे या लेखाद्वारे आम्हा सर्वांतर्फे भावपूर्ण आदरांजली.. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्मरण करून त्यांना वंदन करीत आहोत..



- चारुशीला गोसावी, पुणे


No comments:

Post a Comment