Total Pageviews

Thursday, February 9, 2012

आता हवा आहे तुमचा आशीर्वाद

वाचकहो नमस्कार,
गेली ३२ वर्षे मी व्हायोलीन या वाद्यातून आपल्यापैकी अनेकांना परिचित आहे. अनेकविध कार्यक्रमांना साथ करुन आणि स्वतंत्र व्हायोलीन वादनाचे कार्यक्रम करुन मी तुमचे मन रिझविले. आज मी एका स्वतंत्र कार्यक्रमाची निर्मिती करुन तुमच्यापुढे येत आहे. सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांनी मला माझी स्वतंत्र वादक म्हणून ओळख करायची ही संधी दिली आहे.

येत्या रविवारी पुण्यातल्या बालशिक्षण संस्थेच्या सभागृहात सकाळी १० वाजता स्वतंत्र व्होयोलीन वर सादर होणारा मराठी आणि हिंदी गाण्यांचा कार्यक्रम `व्हायोलीन गाते तेंव्हा...` सादर करतेय.

मी हे शिवधनुष्य उचलले आहे. पेलण्याची जिद्द तुम्ही माझ्या वादनावर प्रेम करणारे असंख्य रसिकांमुळेच मिळाली आहे.
पहिलाच हा शुभारंभाचा कार्यक्रम करावा तो केवळ मनोरंजन आणि त्यातून चार रसिकांची वाहवा मिळवावी अशी माझी इच्छा नव्हती आणि नाही. डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याची माहिती होती.. त्याच्या `लोकबिरादरी प्रकल्पाला` निधी द्यावा आणि त्यातून काही सेवा घडावी अशी खूप इच्छा होती. सुभाष इनामदारांचे स्नेही अरविंद तेलकर यांच्या मदतीने योगायोगाने ती जूळून आली. अनिकेत आमटे यांनी या कार्यक्रमालाच नव्हे तर असे १५ कार्यक्रम करावेत असे पत्रही दिली. आम्ही ते शिरोधार्ह मानून स्व. बाबा आमटे यांनी लावलेल्या रोपट्याला कांही अंशी तरी आर्थिक धन गोळा करुन देऊन त्या महामानवाला वंदन करण्याची हा संधी घेतली.

खरच आज मी खूप समाधानी आणि अतृप्त आहे. समाधान याचसाठी की मला माझे स्वतंत्र अस्तित्व एक व्हायेलीन वादक म्हणून सिध्द करण्याचीसंधी मिळाली. माझ्या साधनेत कीती बळ आहे आणि माझे गुरु व पिता पं. भालचंद्र देव यांनी माझ्यात जी व्हायोलीनची कला रुजविली त्याचेही उतराई होण्याची संधी दिली..आणि अतृप्त यासाठी कलेची सेवा हा प्रचंड महासागर आहे. त्यात आपण कितीही कलेचे पाणी ओतले तरी कमीच. मी एक छोटी कलावंत आहे. त्या सागरात अनेकांनी घागरीने पाणी ओतले. मी त्यातच एक थेंब टाकतेय याची जाणीव आहे.

आता हवे आहे ते एकच.... तुमचा आशीर्वाद आणि कार्यक्रम करण्यासाठी तुमचा पाठिंबा.
मला तो माझ्या वादन क्षेत्रात कांहीतरी स्वतःचे नाव झळकवण्याची संधी द्याल अशी आशा करते आणि इथेच नमस्कारासाठी हात जोडून थांबते.



आपली ,
सौ. चारुशीला गोसावी, पुणे

charusheelagosavi@gmail.com
9421019499

No comments:

Post a Comment